प्रा. वर्षा गायकवाड , अध्यक्ष, मुंबई काँग्रेस

वर्षा गायकवाड या काँग्रेसचे माजी खासदार एकनाथ गायकवाड यांच्या कन्या आहेत. राजकारणात येण्यापूर्वी पाच वर्ष त्यांनी प्राध्यापिका म्हणून काम केलं.२००४ मध्ये त्यांनी सक्रिय राजकारणात पाऊल टाकलं. २००४ ची विधानसभा निवडणूक त्यांनी धारावीतून लढवली.

पहिल्याच निवडणुकीत त्यांना यश आलं. त्यानंतर २००९ मध्ये त्या पुन्हा निवडून आल्या आणि थेट राज्याच्या उच्च व तंत्रशिक्षण, वैद्यकीय शिक्षण राज्यमंत्री झाल्या. २०१० ते २०१४ या काळात त्यांनी महिला आणि बालकल्याण मंत्री म्हणूनही काम केलं. त्यांनी हिंगोलीच्या पालकमंत्री म्हणूनही काम केलं आहे. तसेच मुंबई काँग्रेसच्या उपाध्यक्षा म्हणूनही त्यांनी काम केलं आहे.

महाराष्ट्रात जेव्हा महाविकास आघाडीचं सरकार स्थापन झालं तेव्हा त्या राज्याच्या शालेय शिक्षण मंत्री होत्या. शिक्षण मंत्री होणाऱ्या त्या राज्यातील पहिल्याच महिला ठरल्या आहेत. २०१९ मध्ये वर्षा गायकवाड या चौथ्यांदा निवडून आल्या.
तसेच, लोकसभा निवडणूक २०२४ इंडिया-महाविकास आघाडीच्या मुंबई उत्तर मध्य लोकसभा मतदारसंघातून त्यांना उमेदवारी देण्यात आली आहे.